गोष्टी- जिद्दी माणसांच्या भाग ४
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग-4*
*📝श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*
8308677799
8806150248
*मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड हे त्याचे गाव .वयाच्या पाचव्या वर्षी त्याची आई त्याला कायमची सोडून जाते.पहिलवान असणाऱ्या वडिलांना आपल्या मुलानेही पहिलवान होऊन कुस्तीला वैभव मिळवून द्यावे असे वाटत होते. मोठा झाल्यावर वडिलांच्या स्वप्नांसाठी तो मल्ल विद्देच्या खडतर तपश्चर्येसाठी कोल्हापूरच्या गंगावेस तालमीत दाखल होतो .तेथे त्याचे गुरू होते पै.गणपत खेडकर .प्रचंड मेहनत,शांत स्वभाव,जबरदस्त आत्मविश्वास हे कुस्तीचे सारे गुण त्याच्या अंगी जन्मजातच टिच्चून भरले होते.दिल्लीचा मल्ल सतपालने महाराष्ट्राचा मल्ल दादू चौगुलेला पराभूत करून फरपटत मैदानात मध्यभागी आणून जो विजयाचा उन्माद दाखवला होता .तो लोकांना अजिबात आवडला नव्हता. कुस्तीशौकिंनासाठी असणारी ही भळभळती जखम कुणीतरी पुसायला हवी असे सर्वांना वाटत होते. पण सतपालशी मुकाबला करायला कुणी तयार नव्हते .कारण दुहेरी पट व बकरी पछाड हे त्याचे दोन हुकमी डाव होते. अशावेळी एक तरुण तयार होतो महाराष्ट्राच्या अपमानाचा* *बदला घेण्यासाठी .ठिकाण ठरते बेळगावचे मैदान. .साऱ्या देशाचे लक्ष जणू या लढतीकडे होते. बेळगावात गर्दीने खच्चून भरलेल्या मैदानात १०० किलो सतपालला १४ मिनिटात या ८० किलोच्या पठ्ठयाने चितपट केले.तो दिवस होता ११ जानेवारी १९७७ आणि ही अशक्य अशी लढत जिंकणारा तो तरुण म्हणजे अवघ्या महाराष्ट्रातील कुस्तीकरांचे दैवत कै. हरिश्चंद्र बिराजदार उर्फ मामा*
गंगावेस तालमीत ते अडीच हजार जोर, अडीच हजार बैठका मारायचे, एकाच वेळी तीन तीन मल्लांसोबत झुंजायचे, बोटांची ताकद वाढावी म्हणून साखरेचे रिकामे पोते पिळायचे .पहाटे चारलाच तालमीपासून पन्हाळाच्या बेर्ली पर्यंत पळत सुटायचे, याच मेहनतीचे फळ त्यांना मिळत गेले.
वयाच्या १९ व्या वर्षी ते महाराष्ट्र केसरी झाले. १९७० मध्ये स्कॉटलंडमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकावले. १९७१ मध्ये दिल्लीचा मल्ल नेत्रपालला हरवून रुस्तुम ए हिंद, किताब,. हिंदकेसरी किताब,दादोजी कोंडदेव पुरस्कार,शिवछत्रपती पुरस्कार,ध्यानचंद जीवन गौरव पुरस्काराचे ते मानकरी ठरले.
*त्यांनी पुण्याच्या गोकुळ वस्ताद तालमीतून काका पवार,रवींद्र पाटील,राहुल आवारे,राहूल काळभोर यासारखे पदक विजेते अनेक मल्ल तयार केले. ते गेले तेव्हा लाखो लोकांच्या डोळ्यात पाणी होते.*
*लाकडाचा धूर डोळ्यात पाणी आणतो, मात्र*
*उदबत्तीचा धूर घर आणि मनही सुगंधित करतो. मामांनी हाच सुगंध कुस्तीला गतवैभव प्राप्त करून देऊन सगळीकडे पसरवला. असे म्हणतात वेळेची वाट पाहणाऱ्या लोकांना तितकेच मिळते जे यशस्वी लोकांनी मागे सोडलेले असते.मामांनी आयुष्यात तेच केले संधीची वाट न पहाता स्वतः संधी निर्माण करून नेत्रदिपक इतिहास घडवला.*

Comments
Post a Comment