गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग - ९

 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

 *📝भाग-9*

*📝श्री . चंद्रकांत बोऱ्हाडे*



*उस्मानाबाद जिल्ह्यातील रुईभर हे तालुक्यापासून दहा पंधरा किलोमीटर दूर असणारे तिचे गाव.आई, आजीने रोज शेतात राबने ,प्रसंगी चार घरची धुनी -भांडी  केली तर पोट भरणार अशी  घरची परिस्थिती.मुलीचा भक्कम आधार असणारे वडील अपंग.घरात कुणीही शिकले सवरलेले नाही. अशा खडतर परिस्थितीत श्रीपती भोसले  हायस्कूल मध्ये तिने प्रवेश घेतला.वयाच्या पाचव्या वर्षांपासून तीने खो-खो खेळायला सुरुवात केली.तिच्या प्रचंड हलाखीच्या परिस्थितीत जणू  तिच्यासाठी ऊर्जाच होती.तिला या खेळाने इतके मोठे केले की, एक लहानशा खेड्यातील मुलगी भारतीय खो -खो संघाची कर्णधार बनली.आणि प्रचंड यशस्वी ही ठरली .ती मुलगी म्हणजे खो-खो खेळातील सुवर्ण कन्या  सारिका सुधारकर काळे*.


2006-2007 साली महाराष्ट्र खो-खो संघात  तिची निवड झाली .मग  तिने आपल्या चपळ खेळाच्या जोरावर भारतीय खो-खो संघाच्या कर्णधार  पदापर्यंत झेप घेतली. इतक्या ग्रामीण भागातील मुलीने देशपातळीवर नेतृत्व करणे सोपी गोष्ट नव्हती.या सांघिक खेळात आपल्या खेळाच्या जोरावर तिने संघाला राष्ट्रिय  पातळीवर 12 सुवर्ण,4 रौप्य,4 कांस्य  मिळवून दिली.सलग 20 राष्ट्रीय स्पर्धेत निवड होणारी सारिका एकमेव खो-खो खेळाडू ठरली.आशियाई खो-खो स्पर्धा ,दक्षिण आशियाई खो-खो स्पर्धेत तिने भारताचे नेतृत्व करून भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले .तिच्या या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने अर्जुन पुरस्कार देऊन तिचा गौरव केला.


*मैदानावरील सातत्य,14 वर्षे अविरत सराव, प्रसंगी उपाशीपोटी सराव,वेळेवर अन्न नाही म्हणून मॅगी,टोमॅटो चटणी एकवेळ खाऊन सराव,हीच तिच्या यशाची रहस्ये आहेत, असे प्रशिक्षक चंद्रजित जाधव सांगतात.सारिका  मितभाषी असली तरी मैदानावर ती प्रचंड आक्रमक असते.रेल्वे  संघाकडून खेळणे हे तिचे स्वप्न आहे. परिस्थिती कितीही हलाखीची असली तरी दुःखाच्या कणखर कातळावर जिद्दीने यशाचा झेंडा डौलाने फडकवता येतो .आणि हेच काम सारिका ने केले .म्हणून ती बिकट परिस्थितीतही यशस्वी ठरली.म्हणून तर तिला खो-खो ची सुवर्ण कन्या ही उपाधी सार्थ ठरते.*

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०