राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,


 *पुणे जिल्ह्यातील धानोरे शाळेचा राज्यात डंका* 


*राज्यातील प्रथम क्रमांकाची स्वच्छ सुंदर शाळा म्हणून सन्मान* 


*अखंड महाराष्ट्राचा ज्ञानियांचा राजा ज्ञानेश्वर माऊलींची जिथे समाधी आहे त्या तीर्थक्षेत्र आळंदीपासून अगदी दोन किलोमीटरच्या अंतरावर तुम्ही पूर्वेला गेले की एक टुमदार गाव लागते. त्या गावाचे नाव धानोरे. या गावाला महाराष्ट्राच्या नकाशावर वेगळी ओळख देणारी त्या गावातील आदर्श  जिल्हा परिषद शाळा आज सर्व महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात केंद्रस्थानी आली आहे.त्याचे कारणही तसेच आहे.या आदर्श शाळेने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात राज्यात प्रथम क्रमांक मिळवून पुणे जिल्हा परिषद पुणे शिक्षण विभागाबरोबर धानोरे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. शैक्षणिक सण 2024- 25 मध्ये सहभागी झालेल्या सर्व शाळांचे या अभियानाअंतर्गत विविध उपक्रमांचे मूल्यमापन  केले. या अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना विविध उपक्रमा संदर्भात गुणांकन देण्यात आले होते. यात विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग यामध्ये शाळा व परिसराचे सौंदर्य,शाळेची इमारत,संरक्षित भिंत,वर्ग बोलक्या भिंतींची उभारणी, विद्यार्थी मंत्रिमंडळ, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग, परसबाग,अमृतवाटिका यांची निर्मिती,मेरी माटी मेरा देश उपक्रम, विद्यार्थ्यांनी चालवलेली बचत बँक, नव साक्षरता अभियान विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण,महावाचन चळवळ,शाळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन,स्वच्छता मॉनिटर अभियान,राष्ट्रीय एकात्मता संदर्भात विविध उपक्रम,विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन,आदींचा यात समावेश होता.याचबरोबर व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग,यामध्ये विद्यार्थी आरोग्य तपासणी,विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन,आर्थिक साक्षरता कौशल्य विकास यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन, दानशूर व्यक्ती संस्था यांच्याकडून मिळालेल्या वस्तू व सेवा स्वरूपातील देणगी,शाळा व्यवस्थापन समितीने उत्तम पार पाडलेले कामकाज,तंबाखूमुक्त प्लास्टिक मुक्त शाळा,माजी विद्यार्थी पालक सेवाभावी संस्था यांचा अधिकाधिक सहभाग व योगदान, अशा विविध मुद्द्यांवर व निकषानुसार गुणांकन करून विजयी स्पर्धक शाळांची राज्यस्तरावर निवड करण्यात आली यामध्ये आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरे शाळेने सरस कामगिरीच्या जोरावर संपूर्ण राज्यात अव्वल ठरली. या शाळेतील मुख्याध्यापक श्री सत्यवान लोखंडे हे अनेक वर्षापासून आपल्या सहकारी शिक्षकांबरोबर जीवाचे रान करून या शाळेचे नंदनवन करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. या यशाने त्यांच्या या मेहनतीला विजयाचे तोरण बांधले गेले. हे यश फक्त पुणे जिल्ह्यातीलच नाही तर महाराष्ट्रातील अनेक शाळांना, शिक्षकांना नवी ऊर्जा व प्रेरणा देणारे आहे*. 


*जिल्हा परिषद शाळा दर्जेदार आहेत आणि तेथे शिक्षणही दर्जेदार आहे हेच या यशाने अधोरेखित केले आहे.शिक्षक हा समाजाचा नेता असतो तो अंधाराला भेदून जाणारा प्रकाशाचा किरण असतो. सेनापतीचे नेतृत्व सक्षम असेल तर सैन्य त्याच्याबरोबर कोणतेही युद्ध लढायला तयार असतात हाच लढाऊ बाणा धानोरे शाळेतील मुख्याध्यापक व त्यांच्या शिक्षकांमध्ये पाहायला मिळतो. म्हणूनच गरुडभरारी इतके अचंबित करणारे यश या शाळेला मिळाले आहे. हे यश कोणत्याही तटस्थ माणसाला सहज मिळालेले यश वाटेल पण या गोष्टीला छेद देत प्रचंड परिश्रम, शिस्त, सातत्य,सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता असणारे नेतृत्व,तितकेच शाळेवर प्रेम करणारे ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समिती,आजी-माजी विद्यार्थ, दानशूर देणगीदार,विविध संस्था यांचा या यशात अगदी मोलाचा वाटा आहे. सरकारी शाळांमध्ये प्रकल्प,उपक्रम,प्रयोग करणारे हजारो शिक्षक आहेत सरकारी शाळांचं सकारात्मक रूप धानोरे शाळेसारख्या अनेक शाळांमधून आपल्याला पाहायला मिळते.सरकारी शाळेतील शिक्षकांना बदलत्या काळात कामही करायचे कळतं आणि ते केलेले काम आत्मविश्वासपूर्वक लोकांपर्यंत पोचवायलाही कळते*.


 *2012 साली 240 विद्यार्थी संख्या आणि 10 शिक्षक कार्यरत असणारी धानोरे शाळा आज 1000 पेक्षा अधिक (1011) विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे. 30 पेक्षा जास्त शिक्षकांना बरोबर घेऊन ज्ञानदानाचे पवित्र काम करत आहे.सरकारी शाळांमध्ये अनेक अडचणी आहेत पण याचा कुठलाही बाऊ न करता अनेक संघर्षांवर मात करत धानोरे येथील सर्व वर्ग खोल्या बांधकाम संरक्षण भिंत क्रीडांगण भौतिक सुविधा या* *सीएसआर लोकसहभाग या देणगी मधून उभ्या राहिल्या.आणि न भूतो न भविष्य असे शाळेचे चालते बोलते नवचैतन्यांनी सळसळते ज्ञानमंदिर तयार झाले.या शाळेला जसे मुख्याध्यापक शिक्षक ग्रामस्थ यांनी घडवण्यासाठी रक्ताचे पाणी केले तसेच विविध सेवाभावी संस्थांची मदत मिळाली.यात मे रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल पुणे. मधुसूदन राठी चॅरिटी ट्रस्ट  यांस कडून वर्गखोल्या,संरक्षण भिंत,मैदान सपाटीकरण,संगणक लॅब,प्रयोग साहित्य,सीसीटीव्ही कॅमेरे,ई लर्निंग, संच,लॅपटॉप,मुलींसाठी स्वच्छतागृह, शालेय रंगकाम.इनव्हो लूट टेक्नोलॉजी प्रायव्हेट .(IGW) लिमिटेड यांस कडून आठ वर्ग खोल्या,ग्रामपंचायत धानोरे कडून तीन वर्ग खोल्या, पिण्याचे पाणी, मैदान सपाटीकरण,स्वच्छतागृह*. *मधुसूदन राठी चारिटी ट्रस्ट कडून तीन वर्ग खोल्या हॅन्ड वॉश स्टेशन,सॅनिटरी नॅपकिन,आरो पिण्याचे पाणी.वसंत राठी व श्री विजय राठी शाळेसाठी हॉल रंगकाम व शुशोभीकरण, पुष्पक स्टील, इंद्रायणी फेरोकास्ट यांस कडून पाच वर्ग खोल्या, मे .कैलास वाहन उद्योग धानोरे यांस कडून तीन वर्ग खोल्या मिळाल्या आहेत.आशा रिजाईन्स,रिको इंडस्ट्रीज, ग्रावर अँड वाईल इंडिया लि यांजकडून वर्गखोली व 40 कॉम्प्युटर ची भव्य लॅब, किचन ग्रेस- स्लीक इंटरनॅशनल- एशियन पेंट  यांजकडून फर्निचर,विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था कमी होती वर्गखोल्या अभावी प्रवेश देता येत नव्हता ही अडचण लक्षात घेवून दहा  वर्गखोल्या देणारे पूना राऊंड टेबल नंबर पंधरा या सर्वांचा या यशात मोलाचा वाटा आहे .अतिशय सुंदर स्वच्छ नीटनेटका परिसर हे शाळेचे वैशिष्ट्ये तर आहेच.शिवाय अगदी अप्रतिम मुख्याध्यापक कार्यालय,अद्यावत* *हॉल,गणित,विज्ञान प्रयोगशाळा, शालेय क्रीडांगण ही शाळेची बलस्थाने आहेत. शाळेत प्रवेश केल्यावर आपल्याला येथील निसर्गरम्य मनाला मोहन टाकणारा शाळेचा परिसर काही काळ शाळेत या रेंगाळायला भाग पाडतो*. 


*केवळ भौतिक सुविधाच नाही तर गुणवत्तेच्या बाबतीतही शाळा आपल्याला आघाडीवर असलेली दिसते.जवहार नवोदय विद्यालय,पूर्व  प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती, एन एम एम एस या स्पर्धा परीक्षेमध्ये शाळेचे दोनशे पेक्षा अधिक विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत.पुणे जिल्हा परिषदेतर्फे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून यशवंतराव कला क्रीडा महोत्सव आयोजित केला जातो.या स्पर्धेतही वक्तृत्व,लेझीम,विज्ञान प्रदर्शन, लोकनृत्य,चित्रकला,भजन ल,नाट्य स्पर्धा,प्रश्नमंजुषा या विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवणारी धानोरे शाळा पुणे जिल्हा परिषदेच्या प्रथम क्रमांकाच्या अध्यक्षा चषकाची मानकरी ठरलेली आहे.मुलांमध्ये असणाऱ्या चांगल्या वृत्तीचे योग्य मूल्यमापन होऊन त्यांना प्रेरणा प्राप्त झाली तर त्यांचा त्याबद्दलचा आत्मविश्वास वाढतो व त्यामधील यश संपादन करण्याची त्यांना प्रेरणा निर्माण होते परिणामी मुलांना आत्मविश्वास पूर्ण अभिव्यक्ती प्राप्त होते याचाच एक भाग म्हणून या शाळेमध्ये आगळे वेगळे उपक्रम राबवण्यात येतात.आपण सहजासहजी कुठेही न ऐकलेला,वाचलेला उद्योजकिय मानसिकता विकास हा उपक्रम मुलांच्या उद्योजक वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी एन लर्निंग स्किल डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांस कडून राबवला जातो. कोटक एज्युकेशन फाउंडेशन मुंबई यांस कडून इंग्रजी आकलन क्षमता वाढण्यासाठी स्पिकिंग इंग्लिश कोर्स मुलांच्या इंग्रजी आकलन व बुद्धिमत्तेला वाव देतो.त्याच बरोबर पायजम फाउंडेशन यांच्या कोडींग व रोबोटिकच्या शिक्षणातून मुले कोडींग शिकत आहे छोट्या छोट्या कमांड देत आहे,रोबोट वर आधारित प्रोजेक्ट तयार करत आहे.रूम टू रीड संस्था यांनी स्वतंत्र ग्रंथालय शाळेला उपलब्ध करून दिलेले आहे. स्तरनिहाय अनेक पुस्तके या ग्रंथालयात उपलब्ध असून मुलांची वाचनाची गती वाढवण्यास अनुकूल आहेत.आजच्या जगात मुलांवरती अध्यात्माचे संस्कार व्हावे म्हणून ओळख ज्ञानेश्वरीची हा जगा वेगळा, कोणत्याही शाळेत कदाचित नसेल असा उपक्रम दर शनिवारी धानोरे शाळेत राबवला जातो.यामध्ये सहावी ते आठवी पर्यंतच्या मुलांना अध्यात्मिक मार्गदर्शन केले जाते. वर्षाच्या शेवटी ज्ञानेश्वर महाराज संस्थान,ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती या मुलांचे मूल्यमापन करते. या उपक्रमातून मुलांच्या स्मरणशक्ती आणि पाठांतरात सुधारणा, अध्यात्माची गोडी, सुविचारांची बैठक हे बदल मुलांमध्ये झाल्याचे दिसून आले आहे.जाते.याशिवाय अनेकही ज्ञात अज्ञात संस्था व व्यक्तीचा या शाळेच्या उन्नतीमध्ये अनमोल हातभार लागला आहे.शाळेत छंद वर्ग,रांगोळी,नाटक,विणकाम, शिवणकाम,हरिपाठ,नृत्य,वादन चित्रकला,ओरिगामी इत्यादी उपक्रमातून मुलांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारत आहेत.अत्यंत प्रतिकूल परिस्थिती माणसाला अधिक चांगले घडवते असाच अनुभव आपल्याला बहुतेक सर्व यशस्वी लोकांच्या बाबतीत आलेला आहे. पूर्वीची प्रतिकूल परिस्थिती आजचा इतिहास कष्टातून घडवू शकते .असंख्य प्रकारच्या संधी तुमच्यापुढे उभ्या असतात त्याचा लाभ कसा घ्यायचा हे बदलत्या परिस्थितीशी संघर्ष करून तुम्ही ठरवायचे असते. हाच संघर्षाचा यज्ञ अहोरात्र सुरू ठेवून यशाचा धागा पकडून धानोरे शाळा एक आदर्श शाळा म्हणून संपूर्ण राज्यात नावारूपाला आली आहे*.


 *सर्वार्थाने आदर्श असणारी चांगल्या पैलूंकडे लक्ष देणारी स्वप्नवत वाटणारी,महाराष्ट्रातील हजारो शाळांना आदर्शाचे व निष्ठेचे बोट धरून चालायला शिकवू पाहणारी धानोरे गावात सर्वार्थाने आदर्श असणारी शाळा निर्माण झाली आणि तिचे नाव महाराष्ट्राच्या पटलावर दिमाखाने झळकले आहे.यात स्वतःच्या आयुष्याचे अनेक दिवस रात्र खर्ची घालणारे, आनंदाच्या दुःखाच्या क्षणाची पर्वा करण्यासाठी सवड नसणारे खऱ्या अर्थाने हजारो शिक्षकांपुढे आदर्श असणारे मुख्याध्यापक सत्यवान लोखंडे सर त्यांचे सर्व सहकारी जीवाला जीव देणारे शिक्षक, शिक्षिका,ग्रामस्थ, शाळेच्या चांगल्या कामासाठी काहीही करण्याची तयारी असणारा तरुण वर्ग,गटतट विसरून शाळेच्या विकासासाठी एकत्र येणारा सारा गाव हेच धानोरे शाळेच्या यशाचे रहस्य आहे. प्रशासन म्हणून धानोरे शाळेला सर्वार्थाने प्रोत्साहन व प्रेरणा देणारे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील साहेब,शिक्षणाच्या बाबतीत प्रचंड सकारात्मक विचार असणारे व आस्था असणारे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे साहेब. गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले साहेब विस्तार अधिकारी जीवन कोकणे साहेब या सर्वांचे अनमोल सहकार्य न विसरण्या जोगे आहे. शिकायची आणि शिकवायची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणा देणारी धानोरे शाळा इतरांपेक्षा वेगळी यासाठी ठरते की जिल्हा परिषदेची शाळा असूनही गुणवत्तेच्या भौतिक सुविधांच्या बाबतीत खाजगी शाळांपेक्षा ती कुठेही कमी नाही. म्हणूनच ही शाळा हजारो जिल्हा परिषद शाळांचेच जणू प्रतिनिधित्व करते. शिक्षकांचे शाळांविषयी समर्पण मुलांसाठी त्यांच्या हृदयातून पाझरले तर शिक्षण शास्त्र,अध्यापन पद्धती या पलीकडे जाऊन शिक्षणाची एक वेगळी वाट शिक्षक निर्माण करू शकतो हेच धानोरे शाळेच्या यशाने तुम्हा आम्हाला सांगितले आहे. या यशाच्या निमित्ताने हजारो शाळांना जणू एक नव्या ऊर्जेचा किरण मिळाला आहे. या शाळेचा आदर्श घेऊन मुलांसाठी शिक्षणाचे वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक शाळा या शिक्षकांसाठी पर्यटनाची स्थळे व्हावीत. तुमचे काम जगासमोर यायचे असेल तर तुम्ही प्रचंड मेहनत करत रहा एक दिवस पुरस्काराच्या वाटा तुम्हाला शोधत कोणत्याही कठीण रस्त्यावरून तुमच्या पर्यंत नक्की येऊन पोहोचतात हेच धानोरे शाळेचा यशाने अधोरेखित केले आहे*.


*🖊️लेखन🖊️*

*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे प्राथमिक शिक्षक*

*8806150248*

Comments

Popular posts from this blog

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०