गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ७४
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग -74-*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*
8308677799
8806150248 *कर्नाटक राज्यातील गुर्लहोसूर येथे त्याचा जन्म 20 जून 1869 मध्ये झाला.त्याला लहानपणी एखादी नवीन वस्तू हातात मिळाली की तो ती वस्तू खोलून जोडत असे.वडील काशीनाथ राव यांच्या आग्रहाखातर तो मुंबई येथे जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये चित्रकलेच्या शिक्षणाला प्रवेश घेतो.पण रंगांधळेपणामुळे ते शिक्षण अर्धवट सुटते.पुढे तो व्हिक्टोरिया टेक्निकल इन्स्टिट्यूट मध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून तो काम करतो.येथेच त्याला मशीन जोडणे, दुरुस्ती करणे,नवीन मशीन बनवणे याची माहिती मिळते.तो मुंबई हून बेळगावला येऊन काही दिवस सायकल चे दुकान चालवणे व सायकली विकणे याचा व्यवसाय करतो.या व्यवसायात त्याचे मन फार काळ रमत नाही.मग तो मुलगा दहा हजार रुपये भांडवल बरोबर घेऊन कुंडलरोड येथे एका ओसाड माळरानावर एक स्वतःची कंपनी भावाच्या बरोबर स्थापन करतो.पुढे ती कंपनी अठरा हजार पेक्षा अधिक कामगार आणि करोडो चे मूल्य असणारी कंपनी बनते. ती कंपनी म्हणजे किर्लोस्कर ब्रदर्स कंपनी.आणि ती कंपनी स्थापन करणारा तो मुलगा म्हणजे लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर*.
मराठी माणसाने फक्त नोकरी करावी याला छेद देत त्यांनी इतके मोठे व्यवसाय साम्राज्य त्या काळी उभे केले ही अजिबात सोपी गोष्ट नव्हती.शेतकरी डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपली अनेक उत्पादने बाजारात आणली यात वैरण कापण्याचा अडकित्ता हे त्यांचे पाहिले उत्पादन त्यानंतर त्यांच्या लोखंडी नांगराने शेतीच्या क्षेत्रात क्रांती केली.ऊसाचा रस काढण्याचे यंत्र,हातपंप, ड्रिल मशीन,एमरी ग्राइंडर, लेथ मशीन,ऑईल इंजिन,वीज पंप,शेंगा फोडण्याचे यंत्र,मशीन टूल्स,भातसडीचे यंत्र,एअर कॉम्प्रेसर,फ्रीज कॉम्प्रेसर,मोटर कॅट्रोल गिअर,रहाट, चरक,यासारखी 40 हुन अधिक उत्पादने किर्लोस्कर उद्योग समूहाने बनवून माणसाचे कष्ट हलके केले.
*लक्ष्मणराव यांना साहित्याची ही आवड होती म्हणूनच त्यांनी किर्लोस्कर,स्त्री, मनोहर अशी दर्जेदार साहित्यकृती उद्योग समूहाकडून चालवली.60 पेक्षा अधिक देशात आपली उत्पादने निर्यात करणाऱ्या या उद्योगाने आपल्या कामगारांसाठी वेगळी वसाहत निर्माण केली आहे त्याला पुढे किर्लोस्करवाडी म्हटले जाऊ लागले.त्यात खेळ,आरोग्य, शिक्षण या साऱ्या सुविधा आहेत.45 रुपये महिना पगारावर काम करणारे लक्ष्मणराव यांनी किर्लोस्कर उद्योग साम्राज्य उभे करून मराठी माणसाला देशात नाही तर जगात मानाचे स्थान मिळवून दिले.त्यांच्या जीवनाकडे पाहताना हेच जाणवते की ग्राहकांच्या गरजांची जाणीव,वस्तूंची गुणवत्ता,कडक शिस्त,योजनापूर्वक काम,शून्यातून झेप घेण्याची क्षमता अंगी असेल तर 'यशस्वी 'या शब्दाची वेगळी व्याख्या करावी लागत नाही*.

Comments
Post a Comment