गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ८७
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग -87-*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*
8308677799
8806150248 *महाराष्ट्र राज्यातील सातारा येथील रहिमतपूर येथे त्याचा जन्म 21 ऑक्टोबर 1972 मध्ये झाला.वडील रहिमतपूर येथील न्यायालयात कारकून तर आई गृहिणी.तो लहानपणापासून अभ्यासात हुशार शाळेत कायम पहिला येत असे.घराची परिस्थिती जेमतेम होती.पुढे त्याचे सारे कुटुंब पुण्याला येते.तो दहावी नंतर इलेक्ट्रॉनिक विषयात पदविका प्राप्त करतो.दहा बाय दहा च्या खोलीत दिवस काढतो.आई शिवणकाम करत असताना तिला त्रास नको म्हणून मुलांचे क्लास घेतो.बस साठी एक रुपया मिळत नसे म्हणून चालत कॉलेजला जातो.बी ई ची डिग्री करताना 40 किमी रोज सायकल चालवतो.पण तो मुलगा जगण्याच्या संघर्ष सोडत नाही.पुढे तो मुलगा टेल्को कंपनीतील चांगली नोकरी सोडून भारतातील सर्वात मोठी एकात्मिक सेवा देणारी कंपनी स्थापन करतो.ती कंपनी म्हणजे भारत विकास ग्रुप इंडिया लिमिटेड कंपनी म्हणजेच BVG कंपनी.आणि ती उभी करणारा तो मुलगा म्हणजे श्री हनुमंत गायकवाड*.
टाटा कंपनीत हाऊस किपिंग च्या कामासाठी आठ मुले पुरवण्यापासून BVG कंपनी सुरू झाली आणि ती आज सत्तर हजार पेक्षा अधिक लोकांना रोजगार देणारी कंपनी बनली आहे.राष्ट्रपती भवन,पंतप्रधान कार्यालय,निवासस्थान,सुप्रीम कोर्ट,तिरुपती, शिर्डी,अक्षरधाम,मंदिरे,यासारख्या प्रसिद्ध ठिकाणी BVG कंपनी स्वछता करण्याचे काम करते.देश विदेशातील व 20 राज्यात सुमारे 700 पेक्षा अधिक कंपन्या, संस्था यांचे स्वच्छतेचे काम BVG मार्फत केले जाते.108 क्रमांकावर जलद आरोग्य सेवा देणारी ही एकमेव कंपनी आहे.सुमारे 1700 रुग्णवाहिका यात काम करतात. आशिया खंडात आपत्कालीन सेवा देणारी ही सर्वात मोठी कंपनी आहे. एकट्या दिल्लीत नऊ हजार कामगार BVG तर्फे काम करतात.
*हनुमंतराव यांचा स्वतःवर प्रचंड विश्वास आहे यामुळेच कुर्ल्यावरून फियाट कंपनी पुण्यातील रांजणगाव येथे आणायची होती तेव्हा 8000 हजार ट्रक लावून त्यांनी ती कामगिरी फत्ते केली होती.आपला मित्र उमेश माने यांना बरोबर घेऊन हनुमंतराव यांनी सेवा कंपनी सुरू करण्याचे केलेले धाडस 70 हजार पेक्षा अधिक रोजगार निर्मितीची एक आख्यायिका बनून राहिले आहे.हनुमंतराव आपल्या यशाचे गमक सांगतात ते असे स्वतःची कोणाशीही तुलना करू नका,तुमच्या मध्ये काय उत्तम आहे त्याचा पुरेपूर वापर करा.प्रत्येकाने आपण कशात निपुण आहे हे जाणून घेतले की मिळणारे यश भव्यदिव्य असते*.

Comments
Post a Comment