गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ८२
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग -82-*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*
8308677799
8806150248
*त्याचा जन्म सांगली जिल्ह्यातील तासगाव मधील अंजनी गावात झाला.वडील रामराव तर आई भगिरथी यांची प्रचंड गरिबी.त्याच्या घरात जणू अठरा विश्व दारिद्र्यच.तो प्रसंगी जुनी,फाटलेली कपडे शिवून वापरतो. वडील वारल्यानंतर त्यांचे कपडे फेकून देण्याऐवजी तो परिस्थितीमुळे ते वापरतो.कमवा शिका योजनेतून प्रचंड कष्ट करून बी .ए होतो.प्राचार्य बी.पी.पाटील त्याच्यासाठी देवदूत ठरतात. पुढे तो एल एल बी करतो.इतक्या कठीण परिस्थितीतही तो मुलगा खचत नाही.तो राजकारणात येतो.आणि त्यात इतका यशस्वी होतो की महाराष्ट्र राज्याची ग्रामविकास, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री ही अत्यंत महत्त्वाची पदे भूषावतो.हे सगळे यश मिळवणारा तो मुलगा म्हणजे राजकारणातील निष्कलंक, निरलस व्यक्ती रावसाहेब रामराव पाटिल उर्फ आर.आर.आबा*.
आबा यांनी राजकारण करताना समाज कारणावर कायम भर दिला कारण ते स्वतः अतिशय गरीब परिस्थितीतून पुढे आले होते.म्हणूनच ते गृहमंत्री असताना त्यांनी डान्सबार बंदी केली आणि अनेक संसार पुन्हा उभे केले.ग्रामविकास मंत्री असताना संत गाडगेमहाराज ग्रामस्वच्छता अभियान सुरू केले यामुळे अनेक गावे स्वच्छ झाली.या अभियानाची दखल अगदी संयुक्त राष्ट्र संघाने घेतली.गावातील तंटे गावातच मिटावे म्हणून महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान त्यांनी सुरू केले.गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व त्यांनी स्वतः स्वीकारले होते.1979 ते 1990 पर्यंत जिल्हा परिषद सदस्य व 1990 पासून 2014 पर्यंत सलग विधानसभा आमदार असणारे आबा सुरुवातीला तासगाव चे प्रतिनिधित्व करत नंतर कवठेमहांकाळ चे नेतृत्व त्यांनी केले.
*कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना काळजाला भिडणारी भाषाशैली,स्वच्छ प्रतिमा, समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द या साऱ्या गुणांमुळे आबा वेगळे ठरतात. ते इतके मोठे झाले तरी त्यांच्यातील राजकारणी कधीच गर्विष्ठ झाला नाही.सत्ता येते जाते पण आपल्या सोबतचे लोक कायम असतात असे ते नेहमी म्हणायचे.त्यांचे कुटुंबीयही अगदी साधे आयुष्य जगत आले आहे.आपला पराभव गरिबी कधीच करीत नाही फक्त जे निसर्गाने दिले आहे कर्तबगारीने घालवू नये असे आबांचे मत होते.आबा कर्करोगाने 16 फेब्रुवारी 2015 रोजी गेले तेव्हा लाखो लोकांच्या डोळ्यात पाणी होते.जाता जाता ही आबा हेच सांगून गेले की तुम्ही जगताना इतरांना किती आनंदाचे क्षण दिले ,किती लोकांना आपल्या घासातील घास दिला,अडचणीच्या वेळी कितीदा पाठीवर हात ठेवून आधार दिला यावरच तुम्ही गेल्यावर तुमची किंमत ठरते.तुमच्याकडे किती अफाट संपत्ती आहे यावर नाही*.

Comments
Post a Comment