गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ५२
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग 52-*
*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*
8308677799
8806150248
*वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव येथे तिचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 मध्ये अत्यंत गरीब कुटुंबात झाला.वडील अभिमान साठे हे गुरे राखायचे काम करत असे.घरात अजिबात शैक्षणिक वातावरण नाही.तरीही ती चौथी पर्यत शाळा शिकते.ती नऊ वर्षांची असताना तिच्या पेक्षा वयाने 26 वर्षे मोठ्या असणाऱ्या श्रीहरी बरोबर तिचे लग्न लावून दिले जाते.सासरी प्रचंड सासुरवास सुरू होतो.शेण काढणाऱ्या महिलांना मजुरी मिळत नाही म्हणून ती आवाज उठवते.यामुळे जमीनदार दुखावले जातात.तिच्या पोटातील मूल तिचे नाही अशी आवई उठवली जाते.नवराही तिच्यावर संशय घेतो.तिला मारहाण करून घराबाहेर काढतो.रेल्वे स्टेशन वर भीक मागून ती जीवन जगते. इतक्या भयाण,कठीण प्रसंगातही ती जगणे सोडत नाही.पुढे ती हजारो अनाथ मुलांची आई होते. ती मुलगी म्हणजे अनाथांची आई सिंधुताई सपकाळ उर्फ माई*.
माई यांनी केलेल्या अथांग अशा सामाजिक कार्याबद्दल त्यांना पदमश्री,डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण,अहिल्याबाई होळकर, मूर्तिमंत आई,रिलायन्स फाउंडेशन चा रिअल हिरो,प्राचार्य शिवाजीराव भोसले,सहयाद्रीची हिरकणी, पुणे विद्यापीठाचा जीवन गौरव यासारखे असंख्य पुरस्कार मिळाले.डी.वाय पाटील विद्यापीठाने त्यांचा डॉक्टरेट देऊन सन्मान केला आहे.पुरंदर तालुक्यातील कुंभरवळण येथून 'ममता बाल सदनचा 'सुरू झालेला प्रवास 4 पेक्षा अधिक अनाथाश्रमापर्यंत आला.यात हजारो अनाथ मुले शिकली ,नोकरीला लागली.माईंच्या जीवनावर आलेला 'मी सिंधुताई सपकाळ'हा चित्रपट,अनाथांची यशोदा हा अनुबोधपट तर 'मी वनवासी'हे आत्मचरित्र प्रचंड लोकप्रिय झाले.
*अनाथ मुलांचा सांभाळ करताना पोटच्या मुलीबद्दल माया उत्पन्न होऊ नये म्हणून श्रीमंत दगडू हलवाई गणपती ट्रस्ट ला आपली मुलगी ममता ला दत्तक देणाऱ्या माई हजारो मुलांच्या आई झाल्या.लहान मुलांना भोजन, कपडे,शिक्षण,या मूलभूत गरजा त्यांनी पुरवल्या.शिक्षणानंतर स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत व मार्गदर्शन केले.इतकेच नाही अनेक अनाथ मुले मुली यांचे विवाह ही करून दिले.इतके पुण्य क्वचित कुणाच्या वाट्याला येते.काही दिवस कचऱ्यातील अन्न खाऊन जगणाऱ्या माईंनी मात्र अनेक अनाथ बालकांचे हात कचरा वेचण्यापासून वाचवले आणि शिक्षित केले.माई बद्दल कितीही लिहले तरी शब्द अपुरे. माई यांचे आयुष्य आपल्याला हेच सांगते स्त्री ही सोशिक असतेच पण प्रसंगी दुर्गा होऊन ती संकटावर मातही करते.भयाण संकटात कधीही मागे न हटता जबाबदारी सह गगनभरारी घेण्याची ताकद जगात फक्त आणि फक्त स्त्री कडेच असते*.

Comments
Post a Comment