गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ५९

 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

*📝*भाग -59-*

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अहिरे, ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248    

                   


  *नवरत्नांची खाण असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील पालगड येथे त्याचा जन्म 24 डिसेंबर 1899 मध्ये झाला.वडील सदाशिव तर आई यशोदा. त्याचे घर खोतांचे पण नुसते नावाला मोठे होते.घरी असणाऱ्या गरिबीमुळे त्याच्या वडिलांवर कर्ज होते याच कारणामुळे त्याच्या घरावर जप्ती येते.कधी पुणे कधी दापोली,तर  कधी औंध अशी सारी शिक्षणाची परवड होते.तरीही तो इंग्रजी भाषेत एम.ए उत्तीर्ण होतो.काही दिवस अमळनेर येथे शिक्षक म्हणून नोकरीही करतो,पण प्रचंड देशप्रेमामुळे तो नोकरी सोडून भारतीय स्वातंत्र्य संग्रामात  उडी घेतो.त्याच्या कविता ,भाषणे हजारो लोकांच्या नसानसांत देशप्रेम जागृत करतात.मनाने अत्यंत मृदू असणारा हा मुलगा इंग्रजाशी लढताना वज्राहूनही कठोर होतो.प्रचंड देशप्रेमी, संवेदनशील, लहान मुलांचे प्रचंड वेड असणारा तो मुलगा म्हणजे पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी*.                      


लहान मुलांची प्रचंड आवड असणाऱ्या गुरुजींनी'करील मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभुशी तयाचे' हे लेखन त्याच आत्मीयतेतून केले.विद्यार्थी मासिक सुरू करताना राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली.पंढरपूरच्या  मंदिरात वंचितांना प्रवेश मिळावा म्हणून उपोषण करणारे गुरुजी शेतकऱ्यांना करमाफी व्हावी म्हणून प्रसंगी आक्रमक झाले.इंग्रज सरकारने त्यांचा धसका घेवून 'बलसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो'या गीताच्या प्रती जप्त केल्या होत्या . .नाशिक येथे कारागृहात असताना त्यांनी मातृ प्रेमाने ओतप्रोत भरलेले आणि डोळ्याच्या कडा ओल्या करणारे 'श्यामची आई'हे घराघरात पारायण करण्यायोग्य पुस्तक लिहले.धुळे येथील तुरुंगात विनोबा भावेंची गीताई लिहीणाऱ्या गुरुजींनी 'साधना' साप्ताहिकातून अखंड सदभावनेचा प्रचार केला.               


*कथा,कादंबऱ्या,लेख निबंध, चरित्रे,कविता यावर 73 पेक्षा अधिक पुस्तके त्यांनी लिहीली.त्यांनी लिहीलेल्या श्यामची आई,आणि मोलकरीण या पुस्तकावर आलेले चित्रपट प्रचंड गाजले.रायगड मधील वडघर मुद्रे येथील 36 एकरातील व पुणे येथील दांडेकर पुलाजवळील दत्तवाडी येथील गुरुजींचे स्मारक त्यांच्या महान कार्याची साक्ष देते.खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हे अवघ्या विश्वाला सांगणाऱ्या गुरुजींनी आपले जीवन मात्र आत्महत्या करून संपवले ही घटना शेवटपर्यंत अश्वत्थामाच्या भाळावरील भळभळती जखम बनून राहिली.संस्काराचे पवित्र रोपटे असणाऱ्या गुरुजींना प्र के अत्रे यांनी 'मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी उगाचच म्हणले नाही'.आयुष्याभर साधे जीवन जगलेल्या गुरुजींचे आयुष्य समजून घेताना कायम हेच जाणवते की तुमच्या कर्तृत्वाचा सुगंध दशदिशात पसरतो तो तुमच्यातील चांगुलपणामुळे,नम्रतेने, विनयशीलतेने.हेच सगळे गुण तुम्हाला एकदम मोठे करत नसले तरी एक दिवस असा येतो त्या दिवशी तुम्ही इतरांपेक्षा उजवे ठरता*..


Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०