गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १०९
*📝गोष्टी जिद्दी माणसांच्या पर्व -2 नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*
*📝भाग -9-*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे*
8308677799
8806150249
*त्याचा जन्म 8 एप्रिल 1928 रोजी झाला.त्याचे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील कोवाड.तो माध्यमिक शाळेत असतानाच त्याच्या लेखनाला सुरुवात होते.त्या काळातील अनेक मासिकात त्याच्या कथा छापून येत आणि त्यात त्याला बक्षिसेही मिळत.यातून प्रेरणा घेवून तो अधिक दर्जेदार कथा लेखन करू लागतो पुढे तो मुलगा एक उत्तम कथालेखक, नाटककार,कादंबरीकार म्हणून महाराष्ट्रातच नाही तर देश,परदेशात आपला वाचक वर्ग निर्माण करतो.आपल्या लेखनाचे अनेक चाहते बनवतो.तो मुलगा म्हणजे प्रसिद्ध कादंबरीकार रणजित रामचंद देसाई*.
*रणजित देसाई यांनी ग्रामीण आणि सामाजिक विषयावर लेखन करून आपला ठराविक वाचक वर्ग बनवला.ग्रामीण जीवनावरील कथा जणू चित्रकथाच होत्या इतकी त्याची जिवंत मांडणी ते करत.कणव,कातळ,गंधाली,मधुमती,मोरपंखी सावल्या इ.कथासंग्रह त्यांनी लिहिले.1962 साली थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावर त्यांनी स्वामी कादंबरी लिहिली.या कादंबरीने त्या काळात लोकप्रियतेचे सगळे विक्रम मोडीत काढत प्रचंड विक्रीची कादंबरी म्हणून लौकिक मिळवला.लक्ष्यवेध,पावनखिंड या कादंबऱ्या त्यांच्याच.याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील श्रीमानयोगी,कर्णाच्या जीवनावर लिहिलेली राधेय या कादंबऱ्या प्रचंड गाजल्या*.
*ऐतिहासिक आणि पौराणिक लिखाण ही त्यांची हातोटी होती.रामशास्त्री,धन,वारसा,स्वामी, गरुडझेप,कांचनमृग ही त्यांची नाटके खूप गाजली. बडोदे साहित्य संमेलन,गोरेगाव उपनगर साहित्य संमेलन, कोल्हापूर येथील नाट्य संमेलन येथे त्यांनी अध्यक्ष पदे भूषवली.लिहिणाऱ्या,वाचणाऱ्या समाजाला आणखी डोळस करण्याचे काम रणजित देसाई यांनी केले.त्यांच्या लेखनाचे गारूड आजही इतक्या वर्षांनी मराठी वाचकांवर आहे.हे जग सोडून जाताना त्यांनी आपल्या लेखनाच्या रूपाने सोनेरी पाऊलखुणा मागे ठेवल्या त्या कायमच्याच.त्यांचे आयुष्यातून आपण हेच शिकायचे कि अजून मृत्यूवर कोणालाही विजय मिळवता आलेला नाही मग मिळालेल्या आयुष्याची आपल्या कार्याने कधीही न पुसणारी कर्तृत्वाची रेषा तयार करायची की आयुष्याची माती करून घ्यायची हे आपल्या हातात असते*.


Comments
Post a Comment