गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १२५

 

*📝गोष्टी जिद्दी माणसांच्या** *पर्व -2*

 *नवीन गोष्टी नवीन व्यक्ती* 

*📝भाग -25-*

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे.

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे*

8308677799

8806150249


*त्याच्या जन्म सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील माडगूळ या गावी 5 एप्रिल 1927 रोजी  झाला.त्याच्या वडिलांचे नाव दिंगबर तर आईचे नाव बनुबाई. आटपाडी येथे सहाव्या  इयत्तेपर्यंत त्याचे शिक्षण होते.काही वर्ष आटपाडीला राहिल्यानंतर तो मुंबईला येतो.याच काळात त्याची लेखणी बहरते.अभिरुची या मासिकात त्याची पहिली वाहिली 'काळया तोंडाची' ही कथा प्रसिद्ध  होते.त्याचे मौज साप्ताहिकातून दर आठवड्याला एक अशाप्रकारे माणदेशी माणसांचे व्यक्तिमत्व सदर प्रसिद्ध होवू लागले.ते सदर इतके लोकप्रिय होते की त्यावर पुस्तक येते अख्खा महाराष्ट्र त्या मुलाला ओळखू लागतो.तो मुलगा म्हणजे प्रसिद्ध कथाकार,कादंबरीकार,नाटककार,पटकथालेखक व्यंकटेश दिगंबर माडगूळकर*.


*लहान वयात खेड्यात जीवन गेल्यामुळे तेथील अनुभव घटना माडगूळकर यांच्या मनात कुठेतरी रुतून बसल्या होत्या.त्यात निसर्गाच्या रंगाची उधळण त्यांच्या लेखणीतून होत गेली,त्यामुळे त्यांनी केलेले लेखन अस्सल,जिवंत वाटते.त्यांनी लिहिलेल्या 'माणदेशी माणसे 'या पुस्तकाचे अनेक भाषांत अनुवाद झाले,इतके हे पुस्तक लोकप्रिय झाले. त्यांच्या 'बनगरवाडी 'या अफाट लोकप्रिय कादंबरीवर चित्रपट तयार झाला.या कादंबरीचे इंग्रजी,फ्रेंच,जर्मन,भाषेत अनुवाद झाले.या साहित्यकृतीने माडगूळकर कीर्तिवंत बनवले.उंबरठा, काळी आई,गावाकडील गोष्टी,जांभळाचे दिवस,सीताराम इ कथासंग्रह तर वावटळ,कोवळे दिवस या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या.त्यांच्या  सस्तांतर या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला.सती,तू वेडा कुंभार,बिकट वाट वहिवाट, पती गेले ग काठेवाडी इ नाटके त्यांनी लिहिली.कांगारूंचे दिवस,डोहातील सावल्या,नागझिरा,रानमेवा इ ललित लेख त्यांनी लिहिताना अस्सल ग्रामीण जीवनाचे दर्शन त्यातून घडवले*.


*अंबेजोगाई येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याचा मान त्यांना १९८३ साली मिळाला.'प्रवास एका लेखकाचा 'हे त्यांचे आत्मचरित्र प्रचंड गाजले.लोककला,लोकसंस्कृती यांना जपणारे लेखक,अस्सल ग्रामीण बोलीतील शब्द,वाक्यातील लवचिकता,प्रवाही निवेदन,आणि मराठी मातीतून उगवलेले अस्सल मराठमोळे लेखन ही माडगूळ यांच्या लेखांची वैशिष्ये सांगता येतील.याच कारणाने प्रत्येक मराठी माणसाला ते लेखक म्हणून आपले वाटतात.जनस्थान हा मानाचा पुरस्कार मिळणारे माडगूळकर यांनी स्वप्नरंजन,कल्पनिक्तता यापलीकडे जावून खरेखुरे लोकांना आपले  वाटणारे  लेखन केले.म्हणून ते लेखनात उजवे ठरतात.लेखक इतरांना साहित्यातून आनंद देत असतात.हाच आनंद माडगूळकर कीर्तिवंत बुद्धिवंत जीवन जगताना इतरांना देत राहिले त्यांचे आयुष्य आपल्याला हिच जाणीव करून देते की आपल्या असण्याने,कृतीने,कामाने,इतरांना आनंद मिळत असेल तर तो आनंद वाटत रहा.तो तुम्हाला समोरच्या व्यकीच्या आनंदाच्या रूपाने सव्याज परत मिळेल*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०