गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १०४


 *📝गोष्टी जिद्दी माणसांच्या* 

*📝भाग -104*

*📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे*

8308677799

8806150249


*त्याचा जन्म वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे 26 डिसेंबर1914 रोजी झाला.घरची परिस्थिती चांगली असल्यामुळे तो वकीलीचे शिक्षण पूर्ण करतो.महात्मा गांधीजींच्या कार्याने प्रेरित होऊन समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून वंचित,असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी तो काम सुरू करतो.हे करताना एका पावसाळयात कान,नाक, झडून गेलेला,जखमांनी विव्हळणारा,गटाराच्या कडेला पडलेला एक महारोगी त्याच्या दृष्टीत पडतो.त्याचे मन गलबलून जाते,मनातील करुणा जागृत होते.मग तो तरुण सर्व आयुष्य महारोग्यांच्या सेवेसाठी पणाला लावण्याचे ठरवतो. स्वतः दीपस्तंभ बनून दुःखी लोकांच्या जीवनात आनंदाचा आणि सौख्याचा प्रकाश निर्माण करतो.असा प्रकाश निर्माण करणारा,अनेक अंधारल्या जीवांना जगण्याची नवी उमेद देणारा तो मुलगा म्हणजे शतकातील महान समाजसेवक मुरलीधर देविदास आमटे उर्फ बाबा आमटे*.


*बाबा आमटे यांनी केलेल्या कुष्ठरोग्यांच्या सेवेबद्दल त्यांच्याकडे अनेक पुरस्कार घनदाट अरण्याच्या वाटा शोधत आले.यात पद्मश्री,पद्मविभूषण,गांधी शांतता पुरस्कार, महाराष्ट्र भूषण, डॉ.आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार रॅमन मॅगसेसे पुरस्कार,संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क पुरस्कार,यासारखे असंख्य पुरस्कार त्यांना मिळाले. नागपूर,पुणे विद्यापीठांनी या महान समाज सेवकाचा डी.लीट पदवी देवून सन्मान केला.कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी दिला जाणारा अमेरिकेचा डेमिन डस्टन हा सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे बाबा आमटे सारे आयुष्य अहिंसेच्या मार्गाने जगले*.


*वरोडा,गडचिरोली येथील भाम्रागड,हेमलकसा येथे त्यांनी कुष्ठरोगी लोकांसाठी श्रमदानाने आश्रम उभारले.उपेक्षेचे,अपमानाचे चटके सोसत समाजाने दूर लोटलेले असंख्य कुष्ठरोगी येथे आश्रयाला आले.त्यांच्या उपचारासाठी बाबांनी दवाखाने सुरू केले.उजाड रानावर बाबांनी शेती पिकवली.सुतारकाम,लोहारकाम, चटया बनवणे,भाजीपाला,फळे विकणे असे विविध व्यवसाय त्यांना शिकवून बाबांनी आजारातून बऱ्या झालेल्या लोकांना स्वतःच्या पायावर उभे केले.मुलामुलींसाठी शाळा,महाविद्यालये,वृद्धांसाठी  वृद्धआश्रम,अनाथांसाठी अनाथाश्रम बाबांनी सुरू केले.बाबा इतक्या करुण हृदयाचे होते की जंगली जखमी प्राण्यांवर उपचाराची व्यवस्था त्यांनी केली होती.देशाच्या एकतेसाठी भारत जोडो यात्रा करताना त्यांनी अखंड भारत पालथा घातला.नर्मदा बचाव आंदोलन सक्रिय सहभाग घेतला.मानवतेची अखंड सेवा करणारे कर्मयोगी बाबा आमटे यांचे जीवन आपल्याला हेच सांगते की तुम्ही ज्या समाजात जीवन जगता त्या समाजातील ज्यांचे जन्म मातीत मळले आहे त्यांच्यासाठी आधार व्हा,आणि त्यांच्या दुःखावर फुंकर घाला*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०