गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १०१
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग -101-*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*
8308677799
8806150248
*कुस्तीची पंढरी मानल्या जाणाऱ्या हरियाणा राज्यातील झज्जर मधील गोरिया येथे तिचा जन्म 18 फेब्रुवारी 2002 साली झाला.आई सुमेधा आणि नेव्ही मध्ये इंजिनियर असणारे वडील रामकिशन यांनी लेकीवर चांगले संस्कार करताना तिची खेळाची आवड जोपासली.ती खेळ खेळताना मुष्टियुद्ध,टेनिस,मार्शल आर्ट,स्केटिंग अशा अनेक खेळात प्रवीण होती.तिला खर तर बॉक्सर व्हायचे होते पण बॉक्सिंग खेळताना झालेली जीवघेणी जखम तिला एअर पिस्टल या खेळाकडे घेवून आली.प्रसिद्ध नेमबाज जसपाल राणा सारखे कसलेले प्रशिक्षक तिला मिळाले.मग या खेळात या मुलीने कधीही मागे वळून पाहिले नाही.रोज सहा-सात तास नेमाबाजीचा सराव करताना अशी काही धडाकेबाज कामगिरी केली की जगात अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला 2024 मध्ये पॅरीस येथे नेमबाजी मध्ये तब्बल बारा वर्षांनी ब्राँझ पदक मिळवून दिले.अशी असामान्य कामगिरी तिने फक्त वयाच्या बाविसाव्या वर्षी करून दाखवली.हे यश मिळवणारी ती मुलगी म्हणजे भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर.*.
*खेळातील कौशल्य,चिकाटी,खेळताना वापरलेले तंत्र,सातत्य,प्रचंड आत्मविश्वास यामुळे मनूला हे यश मिळाले.मनूला वयाच्या 17व्या वर्षी ज्युनियर चॅम्पियनशिप मध्ये रौप्य पदक,18व्या वर्षी युथ ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक,ISSF जागतिक स्पर्धेत सर्वात कमी वयात गोल्ड मेडल.कॉमन वेल्थ गेम मध्ये चॅम्पियन,यासारखी असंख्य पदके तिला मिळाली.तिने केरळ नॅशनल चॅम्पियनशीप मध्ये सलग नऊ सुवर्ण पदके जिंकून नवीन राष्ट्रीय विक्रम केला.2021ला इंडीयन स्पोर्ट वूमन ऑफ द ईयर पुरस्काराने तिचा गौरव करण्यात आला आहे*.
*मनूला लहान वयामध्ये परवानाधारक पिस्तूल वापरायची परवानगी सार्वजनिक वाहनात नव्हती.तिला स्पर्धेला पिस्तूल घेवून जाता यावे,स्वतः तिच्या सोबत जाता यावे म्हणून नोकरी सोडणारे मनुचे वडील तिच्यासाठी खरेखुरे आयडॉल आहेत.ठरवून दिलेले गुण मनूला मिळवता आले नाही तर तिचे प्रशिक्षक तिला ती ज्या देशात खेळायला असेल तिथल्या चलनात दंड करून ते पैसे समाज कार्यासाठी वापरायची आगळी वेगळी शिक्षा करत असे.ज्या मुलीचा टोकियो ऑलिम्पिक मध्ये पिस्तूल खराब होऊन तिला पहिल्याच फेरीत मागे फिरावे लागले होते.त्या मुलीने त्याच स्पर्धा प्रकारात पुढील स्पर्धेत प्रचंड मेहनत घेत देशाला पदक मिळवून देणे ही गोष्ट जितकी दुर्मिळ तितकीच अजिबात सोपी नाही.मनू लढली आणि जिंकलीही.बॉक्सिंग मध्ये डोळ्यावर झालेली जीवघेणी जखम विसरून मनूने नेमबाजी मध्ये अद्भुत कामगिरी केली. मनूचे आयुष्य आपल्याला हेच सांगते तुमच्या आयुष्यात यशस्वी होताना कायम दुसरा पर्याय ठेवा.पहिल्यात अयशस्वी झालात तरी दुसरी संधी तुम्हाला तुमच्या प्रचंड मेहनतीने तुम्हाला निराश न करता यश शिखरावर घेवून जाईल*.

Comments
Post a Comment